Thursday, January 29, 2009

Chandra Aahe Sakshila (पान जागे फूल जागे, भाव नयनी जागला)



पान जागे फूल जागे, भाव नयनी जागला,
चंद्र आहे साक्षिला, चंद्र आहे साक्षिला

चांदण्याचा गंध आला, पौर्णिमेच्या रात्रिला,
चंद्र आहे साक्षिला, चंद्र आहे साक्षिला !

स्पर्श हा रेशमी, हा शहारा बोलतो
सूर हा, ताल हा, जीव वेडा डोलतो
रातराणीच्या फुलांनी, देह माझा चुंबिला !

लाजरा, बावरा, हा मुखाचा चंद्रमा
अंग का चोरिसी, दो जीवांच्या संगमा
आज प्रीतीने सुखाचा, मार्ग माझा शिंपिला !






Chandnyat Phirtana (चांदण्यात फिरताना)



चांदण्यात फिरताना माझा धरलास हात !
सखया रे, आवर ही सावर ही चांदरात !

निजलेल्या गावातुन आले मी एकटीच;
दूर दिवे कळलावे पडले मागे कधीच;
ह्या इथल्या तरुछाया पण सारे जाणतात !

सांग कशी तुजविनाच पार करू पुनवपूर ?
तुज वारा छळवादी अन्‌ हे तारे फितूर !
श्वास तुझा मालकंस ! स्पर्श तुझा पारिजात !

जाऊ चल परत गडे, जागले न घर अजून,
पण माझी तुळस तिथे गेली रे हिरमुसून
तुझिया नयनात चंद्र ! माझ्या हृदयी प्रभात !


Ghanashyam Sundara (घनःश्याम सुंदरा)

घनःश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला
उठिं लवकरि वनमाळी उदयाचळी मित्र आला

आनंदकंदा प्रभात झाली उठी सरली राती
काढी धार क्षीरपात्र घेउनी धेनु हंबरती
लक्षताती वासुरें हरि धेनु स्तनपानाला

सायंकाळीं एके मेळीं द्विजगण अवघे वृक्षीं
अरुणोदय होताचिं उडाले चरावया पक्षी
प्र्भातकाळी उठुनि कावडी तीर्थ पंथ लक्षी
करुनी सडासंमार्जन गोपी कुंभ घेऊनी कुक्षीं
यमुनाजळासि जाति मुकुंदा दध्योदन भक्षी

कोटी रवीहून तेज आगळें तुझिया वदनाला
होनाजी हा नित्य ध्यातसे हृदयी नाम माला

Tu teva Tashi Tu Teva Ashi (तू तेव्हा तशी तू तेव्हा अशी)



तू तेव्हा तशी, तू तेव्हा अशी
तू बहराच्या, बाहूंची

तू ऐलराधा, तू पैल संध्या
चाफेकळी प्रेमाची

तू नवी जुनी, तू कधी कुणी
खारीच्या गं डोळयांची

तू हिरवी कच्ची, तू पोक्त सच्ची
तू खट्टी मिठ्ठी ओठांची


Ti Aai Hoti Mhanuni Ghanvyakul Mi hi Radlo (ती आई होती म्हणूनी)


ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता
मेघांत अडकली किरणे, हा सूर्य सोडवित होता

ती आई होती म्हणूनी, घनव्याकूळ मी ही रडलो
त्यावेळी वारा सावध, पाचोळा उडवित होता

अंगणात गमले मजला, संपले बालपण माझे
खिडकीवर धुरकट तेव्हा, कंदील एकटा होता

Gele Dyayche Rahun (गेले द्यायचे राहून)

गेले द्यायचे राहून, तुझे नक्षत्रांचे देणे;
माझ्यापास आता कळ्या, आणि थोडी ओली पाने

आलो होतो हासत मी, काही श्वासांसाठी फक्त;
दिवसांचे ओझे आता, रात्र रात्र शोषी रक्त

आता मनाचा दगड, घेतो कण्हत उशाला;
होते कळ्यांचे निर्माल्य, आणि पानांचा पाचोळा

Gele Te Din Gele (गेले ते दिन गेले)



वेगवेगळी फुले उमलली, रचुनि त्यांचे झेले
एकमेकांवरी उधळले, गेले ते दिन गेले

कदंब तरुला बांधून दोला, उंच खालती झोले
परस्परांनी दिले घेतले, गेले ते दिन गेले

हरीत बिलोरी वेलबुटीवरी, शीतरसांचे प्याले
अन्योन्यांनी किती झोकले, गेले ते दिन गेले

निर्मल भावे नव देखावे, भरुनी दोन्ही डोळे
तू मी मिळूनी रोज पाहिले, गेले ते दिन गेले

Khulvite Mi Hi Maza Rang Gorapan (खुलविते मेंदी माझा रंग गोरापान)



खुलविते मेंदी माझा रंग गोरापान हो रंग गोरापान
गोरा गोरा पान जसं केवड्याचं रान बाई ग केवड्याचं रान

दोन डोळे नंदादीप, पेटले हे आपोआप
काजळली पापण्यांची, बदामी कमान हो रंग गोरापान

नीलमणी नयनांत, हिरकण्यांचे हो दात
ओठ लाल लाल माझे, माणकासमान हो रंग गोरापान

नवी लाज लाजते मी, नवा साज साजते मी
लाजऱ्या मनाला माझ्या, करा बंदिवान हो रंग गोरापान

Kenvha Tari Pahate Ultun Ratra Geli (केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली)



केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली
मिटले चुकून डोळे हरवून रात्र गेली

कळले मला न केव्हा सुटली मिठी जराशी
कळले मला न केव्हा निसटून रात्र गेली

सांगू तरी कसे मी वय कोवळे उन्हाचे ?
उसवून श्वास माझा फसवून रात्र गेली !

उरले उरात काही आवाज चांदण्यांचे .....
आकाश तारकांचे, उचलून रात्र गेली !

स्मरल्या मला न तेव्हा माझ्याच गीतपंक्ती
मग ओळ शेवटची सुचवून रात्र गेली !

आता कुशीत नाही ती चंद्रकोर माझी .....
( हलकेच कूस माझी बदलून रात्र गेली )

अजुनी सुगंध येई दुलईस मोगऱ्याचा .....
गजरा कसा फुलांचा विसरुन रात्र गेली ?

Ketakichya Bani Tithe Nachla Ga Mor (केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर)



केतकीच्या बनी तिथे, नाचला ग मोर
गहिवरला मेघ नभी, सोडला ग धीर

पापणीत साचले, अंतरात रंगले
प्रेमगीत माझिया, मनामनात धुंदले
ओठावरी भिजला ग, आसावला सूर

भावफूल रात्रिच्या अंतरंगि डोलले
धुक्यातुनी कुणी आज, भावगीत बोलले
डोळियात पाहिले, कौमुदीत नाहले
स्वप्नरंग स्वप्नीच्या, सुरासुरात थांबले
झाडावरी दिसला ग, भारावला चकोर

Apradh Maza Asa Kay Zala (अपराध माझा असा काय झाला)

का रे दुरावा, का रे अबोला
अपराध माझा, असा काय झाला

नीज येत नाही, मला एकटीला
कुणी ना विचारी, धरी हनुवटीला
मान वळविसी तू, वेगळ्या दिशेला

तुझ्या वाचूनी ही, रात जात नाही
जवळी जरा ये, हळू बोल काही
हात चांदण्याचा, घेई उशाला

रात जागवावी, असे आज वाटे
तृप्त झोप यावी, पहाटे पहाटे
नको जागणे हे, नको स्वप्नमाला

Airanichya Deva Tula Thingi Thingi Vahu De (ऐरणिच्या देवा तुला ठिणगि ठिणगि वाहु दे)

ऐरणिच्या देवा तुला, ठिणगि ठिणगि वाहु दे
आभाळागत माया तुजी, आम्हांवरी ऱ्हाउ दे

लेउ लेनं गरीबीचं, चनं खाऊ लोकंडाचं
जीनं व्होवं अबरुचं, धनी मातुर, माजा देवा, वाघावानी असू दे

लक्शिमिच्या हतातली चवरि व्हावी वर खाली
इडा पीडा जाइल, आली किरपा तुजी, भात्यांतल्या सुरसंगं गाउ दे !

सूक थोडं, दुक्क भारी, दुनिया ही भली-बुरी
घाव बसंल घावावरी, सोसायाला, झुंजायाला, अंगि बळं येउ दे !

Uthi Uthi Gopala (उठि उठि गोपाला)



मलयगिरीचा चंदनगंधित धूप तुला दाविला
स्वीकारावी पूजा आता, उठि उठि गोपाला

पूर्व दिशेला गुलाल उधळुन ज्ञानदीप लाविला
गोरस अर्पुनि अवघे गोधन गेले यमुनेला
धूप दीप नैवेद्य असा हा सदुपचार चालला

रांगोळ्यांनी सडे सजविले रस्त्यारस्त्यातुन
सान पाउली वाजति पैंजण छुन छुनुन छुन छुन
कुठे मंदिरी ऐकू येते टाळांची किणकिण
एकतानता कुठे लाविते एकतारिची धून
निसर्ग मानव तुझ्या स्वागता असा सिद्ध जाहला

रजद्वारी झडे चौघडा शुभःकाल जाहला
सागरतीरी ऋषीमुनींचा वेदघोष चालला
वन वेळूंचे वाजवि मुरली, छान सूर लागला
तरुशिखरावर कोकिलकविने पंचम स्वर लाविला

Ugavala Chandra Punvecha (उगवला चंद्र पुनवेचा)



उगवला चंद्र पुनवेचा !
मम हृदयी दरिया ! उसळला प्रीतिचा !

दाहि दिशा कशा खुलल्या,
वनिवनी कुमुदिनी फुलल्या,
नववधु अधिर मनी जाहल्या !
प्रणयरस हा चहुकडे ! वितळला स्वर्गिचा ?

Jivalaga Rahile Door Ghar Maze (जिवलगा राहिले रे दूर घर माझे)



जिवलगा, राहिले रे दूर घर माझे !
पाउल थकले, माथ्यावरचे जड झाले ओझे
जिवलगा, राहिले रे दूर घर माझे !

किर्र बोलते घन वनराई
सांज सभोती दाटुन येई
सुखसुमनांची सरली माया, पाचोळा वाजे

गाव मागचा मागे पडला
पायतळी पथ तिमिरी बुडला
ही घटकेची सुटे सराई, मिटले दरवाजे

निराधार मी, मी वनवासी
घेशिल केव्हा मज हृदयासी ?
तूच एकला नाथ अनाथा महिमा तव गाजे

Aali Thumkat Naar Lachkat (आली ठुमकत नार लचकत)



कुण्या गावाचि, कुण्या नावाचि,
कुण्या राजाचि, तू ग राणी
आली ठुमकत, नार लचकत,
मान मुरडत, हिरव्या रानी

खुळू-खुळू घुंगराच्या, तालावर झाली दंग
शालू बुट्टेदार, लई लई झाला तंग
सोसंना भार, घामाघूम झालं अंग
गोऱ्या रंगाचि, न्याऱ्या ढंगाचि
चोळि भिंगाचि, ऐन्यावानी

डळिंबाचं दाणं तुझ्या, पिळलं ग व्हटावरी
गुलाबाचं फूल तुझ्या, चुरडलं गालावरी
कबूतर येडं खुळं, फिरतया भिरी भिरी
तुझ्या नादानं, झालो बेभान
जीव हैरान, येड्यावानी

कवळ्यात घेऊनीया, अलगद उचलावं
मऊ मऊ हिरवाळीत, धैवरात भिजवावं
पिरतीचं बेन तुझ्या, काळजात रुजवावं
लाडीगोडीनं, पुढल्या ओढीनं
जाउ जोडीनं, राजा-रानी

Runanubandhachya Jithun Padlya Gathi (ऋणानुबंधांच्या जिथून पडल्या गाठी)



ऋणानुबंधांच्या जिथून पडल्या गाठी
भेटीत तृष्टता मोठी

त्या कातरवेळा थरथरती कधि अधरी
त्या तिन्हीसांजांच्या आठवणी त्या प्रहरी
कितिदा आलो, गेलो, रमलो
रुसण्यावाचुनि परस्परांच्या कधी न घडल्या गोष्टी

कधि तिने मनोरम रुसणे
रुसण्यात उगीच ते हसणे
म्हणून ते मनोहर रुसणे
हसणे, रुसणे, रुसणे, हसणे
हसण्यावरती रुसण्यासाठी, जन्मजन्मिच्या गाठी

कधि जवळ्‌ सुखाने बसलो
दुःखात सुखाला हसलो
कधि गहिवरलो, कधि धुसफुसलो
सागरतीरी आठवणींनी वाळूत मारल्या रेघा,
जन्मासाठी जन्म जन्मलो, जन्मात जमली ना गट्टी